निलेवाडीतून धाराशिव पूरग्रस्तांसाठी अन्नधान्य व वस्त्रांची मदत रवाना

हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी (नवे पारगाव) येथील ग्रामस्थांनी आपल्यावर 2019 व 2021 साली आलेल्या महापुराच्या आपत्तीची आठवण ठेवत, त्या वेळी मिळालेल्या राज्यभरातील मदतीचे ऋण फेडण्याच्या भावनेतून आपले कर्तव्य पार पाडले.
धाराशिव जिल्ह्यात महापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर, निलेवाडीतील युवकांनी पुढाकार घेऊन प्रत्येक घरातून अन्नधान्य, कपडे आणि जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या. या मदतीस ग्रामस्थांनी भरभरून प्रतिसाद दिला. सर्व साहित्य एकत्र करून मदतीचे किट तयार करण्यात आले व धाराशिवच्या पूरग्रस्त गावांना वितरित करण्यासाठी गाडी रवाना करण्यात आली.
या उपक्रमात गावचे सरपंच माणिक घाटगे व सर्व तरुण कार्यकर्ते उपस्थित होते. सरपंचांनी युवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे आभार मानले आणि या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले.





