दौंड येथील पिरॅमिड हॉस्पिटलवर तातडीने कठोर कारवाई करण्याची आरोग्य उपसंचालकांकडे मागणी – भाजप दौंड शहर युवक अध्यक्ष ओमकार कड्डे

पुणे जिल्हा प्रतिनिधी सदाशिव रणदिवे
पुणे/दौंड: दौंड शहरात पिरॅमिड हॉस्पिटल आणि डॉ. समीर कुलकर्णी यांच्यामार्फत सुरू असलेल्या अत्यंत धोकादायक व चुकीच्या वैद्यकीय उपचारां विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. भाजपचे दौंड शहर युवक अध्यक्ष ओमकार कड्डे यांनी आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडे या संदर्भात निवेदन सादर केले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, पिरॅमिड हॉस्पिटलमध्ये शेकडो रुग्णांवर चुकीच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून, त्यांच्या जीविताशी खेळण्याचा गंभीर प्रयत्न होत आहे. विशेष म्हणजे, विविध शासकीय आरोग्य योजनांमधून रुग्णांना मोफत उपचार मिळत असतानाही, हॉस्पिटलकडून रुग्णांकडून अवैधपणे पैसे आकारले जात आहेत.
या गंभीर गैरप्रकाराबाबत गेल्या जुलै महिन्यापासून उपजिल्हा रुग्णालय दौंडचे अधीक्षक डॉ. सचिन गुजर आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ यमपल्ले यांच्याकडे वारंवार तक्रारी दाखल करूनही आरोग्य प्रशासनाकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. प्रशासनाच्या या उदासीनतेमुळे सामान्य रुग्णांची फसवणूक सहमतीने चालू असल्याचा आरोप ओमकार कड्डे यांनी केला आहे.
या प्रकरणी सखोल चौकशी झाल्यास आरोग्य खात्यातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस येईल, असे कड्डे यांनी ठामपणे सांगितले आहे.ओमकार कड्डे यांनी उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्याकडे जोरदार मागणी केली आहे की,पिरॅमिड हॉस्पिटल आणि संबंधित डॉ. समीर कुलकर्णी यांच्यावर तातडीने कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
या गैरप्रकारात सामील असलेल्या प्रशासकीय डॉक्टरांवर देखील योग्य ती कारवाई करावी.सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी होणारा हा अक्षम्य खेळ त्वरित थांबवून दोषींवर लवकरात लवकर कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजप दौंड शहर युवक अध्यक्ष ओमकार कड्डे यांनी केली आहे.





