सत्याचा शिलेदार महाराष्ट्र राज्य विशेष प्रतिनिधी डॉ. उमेश सुतार
अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर, छत्रपती घराण्याने यंदाचा दसरा उत्सव साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. या निर्णयानुसार, दसऱ्याच्या पारंपरिक सीमोलंघनासाठी वापरण्यात येणारा शासकीय खर्च पूरग्रस्तांच्या मदतीसाठी वर्ग केला जाणार आहे. सातारा येथील छत्रपती घराण्याने राज्यातील पूरबाधित भागांतील नागरिकांच्या दुःखात सहभागी होत, त्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.
सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि त्यामुळे निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशा कठीण परिस्थितीत, उदयनराजे भोसले यांच्या या निर्णयामुळे पूरग्रस्तांना मोठा आधार मिळणार आहे. छत्रपती घराण्याच्या या संवेदनशील भूमिकेचे सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे.





