शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्या, अन्यथा रस्त्यावर उतरू – उद्धव ठाकरे यांचा सरकारला इशारा
उस्मानाबाद, २५ सप्टेंबर: मराठवाड्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीच्या प्रचंड नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारकडे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची जोरदार मागणी केली आहे. त्यांनी सरकारला इशारा दिला की, शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल.
पूरग्रस्त भागाचा दौरा करताना ठाकरे म्हणाले, “शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाला आहे. त्याला आधाराची गरज आहे. दिवाळीपूर्वी हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीची मदत जाहीर करा आणि त्यांचे कर्ज माफ करा. बँकांनी शेतकऱ्यांना नोटिसा पाठवू नयेत. शेतकऱ्यांच्या नोटिसा आमच्या कार्यालयात पाठवा, आम्ही पाहतो,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
ठाकरे यांनी PM CARE Fund मधून शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी सूचनाही सरकारला केली. “शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची असेल तर पंचांग पाहावं लागेल का?” असा उपरोधिक सवाल करून त्यांनी सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
शेवटी ठाकरे म्हणाले, “शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे सरकारने वेळीच लक्ष न दिल्यास शिवसेना त्यांच्या पाठिशी उभी राहील आणि रस्त्यावर उतरेल.”





