डॉ. प्रकाश आमटे यांना ‘स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार’; मुख्यमंत्री फडणवीस यांचा गौरवोद्गार
धुळे, दि. २७ : आदिवासी समाजाच्या उत्थानासाठी आरोग्य, शिक्षण, शेती आणि जलसंधारण क्षेत्रात कार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे यांना ‘स्व. दाजीसाहेब रोहिदास पाटील जनसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धुळ्यातील श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या मैदानावर झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार देण्यात आला.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, डॉ. आमटे यांच्या कार्यामुळे पुरस्काराची प्रतिष्ठा वाढली आहे. बाबा आमटे यांच्यापासून सुरू झालेल्या लोकसेवेचा वारसा डॉ. प्रकाश आमटे यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून समर्थपणे पुढे नेला. त्यांच्या कार्यामुळे अनेक आदिवासी तरुण वैद्यकीय व अभियांत्रिकी क्षेत्रात पुढे गेले आहेत.
कार्यक्रमास मंत्री कैलास विजयवर्गीय, जयकुमार रावल, खासदार स्मिता वाघ, मंदाकिनी आमटे, लता पाटील, माजी आमदार कुणाल पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
फडणवीस यांनी सांगितले की, सुलवाडे-जामफळ प्रकल्प, मनमाड-इंदूर रेल्वे व राष्ट्रीय महामार्गांमुळे धुळ्याचा विकास वेग घेणार आहे. तसेच, नाशिक-धुळे संरक्षण कॉरिडॉरमुळे रोजगाराच्या संधी वाढणार आहेत.





