सातवे येथे विवेकानंद विद्या मंदिरमध्ये आयोजित पालक मेळाव्यानिमित्त समुपदेशक अशोक भोईटे यांचा सत्कार करताना सचिव दादा जाधव व इतर मान्यवर.
सातवे प्रतिनिधी:
सातवे येथील विवेकानंद विद्या मंदिर व शिशुविहार विद्यालयात पालक मेळावा आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला, तसेच पालकांशी सुसंवाद साधत बालकांच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये समुपदेशक अशोक भोईटे यांचा त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी, डॉ. रोहन राजेंद्र बच्चे यांचा एम.बी.बी.एस. पदवी पूर्ण केल्याबद्दल, विभावरी पाटील यांचा सार्वजनिक बांधकाम विभागात अभियंता म्हणून निवड झाल्याबद्दल, पृथ्वीराज जाधव व विवेक बाबुराव आलुगडे यांचा एम.बी.बी.एस. साठी अनुक्रमे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय व के.एम. कॉलेजमध्ये झालेल्या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला.
प्रमुख वक्ते म्हणून समुपदेशक अशोक भोईटे यांनी ‘पालक-पाल्य संवाद’ या विषयावर विचारमंथन केले. त्यांनी मुलांच्या भावनिक, बौद्धिक, शारीरिक व सामाजिक विकासात पालकांच्या भूमिकेचे महत्त्व स्पष्ट करत अनेक उदाहरणांद्वारे मार्गदर्शन केले. संस्थेचे कार्याध्यक्ष राजाराम शिनगारे यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे नियोजन कसे करावे यावर उपयुक्त माहिती दिली.
या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष महिपती घाटगे, उपाध्यक्ष शिवाजी चव्हाण, सचिव दादा जाधव, सदस्य विलास पाटील, आनंदकुमार जाधव तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अश्विनी चव्हाण, वंदना पवार, श्वेता बच्चे, प्रतिभा वडिंगेकर, राजलक्ष्मी खाडे, मनीषा बच्चे, उमा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रभावीपणे पार पडले, तर आभार प्रदर्शन वंदना पवार यांनी केले.






