दौंड, दि. ८ मार्च २०२६ (प्रतिनिधी – सदाशिव रणदिवे):
जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान आणि त्यांचे हक्क यांची जाणीव प्रत्येकाने ठेवली पाहिजे, असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी बी. वा. जगताप यांनी केले. दौंड येथील नालंदा बुद्ध विहारात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ८ मार्च १९०८ रोजी अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात सुमारे १५ हजार महिलांनी क्लारा झेटकिन यांच्या नेतृत्वाखाली मोठा मोर्चा काढला होता. कामाच्या ठिकाणी संरक्षण, कामाचे तास कमी करणे, पुरुषांप्रमाणे समान वेतन आणि मतदानाचा अधिकार अशा मागण्या त्या महिलांनी केल्या. या मागण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली आणि महिलांच्या सन्मानासाठी ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जाऊ लागला.
दौंड येथील भोईटे नगरमधील बुद्धिस्ट नालंदा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. भीमराव मोरे होते. यावेळी सामुदायिक धम्मवंदना व धम्मसभा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमास आयु. गोरख घोडके, राजू कांबळे, के. के. खंडीजोड, सूर्यकांत जानराव, दिलीप सुर्वासे, सुरेखा जानराव, सैदाप्पा गायकवाड, सुरेखा गोरख घोडके, आयु. सूर्यवंशी तसेच अनेक उपासक-उपासिका उपस्थित होत्या.






