तळसंदे: ‘विकसित भारत युवा संसद’ चे उद्घाटन करताना प्रा. डॉ. जयेंद्र खोत. समवेत अवधूत गायकवाड, डॉ. प्रल्हाद माने, पूजा सैनी, सुजीत सरनाईक, अभिजित शिंदे आदी.
तळसंदे:भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयांतर्गत ‘मेरा युवा भारत’ कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘विकसित भारत युवा संसद’ ही जिल्हास्तरीय स्पर्धा डी. वाय. पाटील कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ, तळसंदे येथे उत्साहात पार पडली. स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्यातील ६० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून विविध विषयांवर विचारमंथन केले.
‘विकसित भारत युवा संसद’ म्हणजे तरुणांनी देशाच्या विकासाबद्दल विचार मांडण्यासाठी आणि संसदीय पद्धतीने चर्चा करण्यासाठी निर्माण केलेले व्यासपीठ आहे. युवा वर्गाला लोकशाही प्रक्रिया आणि संसदीय पद्धतीची ओळख करून देणे आणि देशाच्या विकासाशी संबंधित विषयांवर विचार मांडणे आणि चर्चा करणे या हेतुने हा उपक्रम राबवला जातो. ‘आणीबाणीची ५० वर्षे : भारतीय लोकशाहीसाठी धडे’ या विषयावर या विषयावर हि स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये विद्यापिठाच्या कु. तन्वी रमेश भोसले हिने जिल्हास्तरावर ५ वा क्रमांक मिळवला असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे.
या कार्यक्रमात ‘युवा कनेक्ट’ या सत्रात अवधूत गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना, ‘संधी ओळखा, कधीही भीऊ नका; नवनवीन क्षेत्रांचा शोध घ्या आणि प्रत्येक संधीचा लाभ घ्या’ असा संदेश दिला.
कुलसचिव प्रा. डॉ. जयेंद्र खोत यांनी ‘युवा कनेक्ट’ उपक्रमाचे महत्त्व अधोरेखित केले. आजच्या युवकांनी शैक्षणिक प्रगतीसोबतच कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि नेतृत्वगुण विकसित करणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे युवकांना विचार मांडण्याची व नेतृत्व विकसित करण्याची संधी मिळते, असे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेत बुद्धा सुखदेव कोरवी (राजाराम महाविद्यालय) याने प्रथम क्रमाक प्राप्त केला. तर वैष्णवी रविंद्र पोतदार (शिवाजी विद्यापीठ) हिने द्वितीय, अनुष्का धनंजय कुरणे (न्यू लॉ कॉलेज) हिने तृतीय, अभिषेक तानाजी सुतार (भारती विद्यापीठ) याने चौथा तर तन्वी रमेश भोसले (डी वाय पाटील कृषी व तंत्र विद्यापीठ) हिने पाचवा क्रमांक मिळवला. या सर्वांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. स्पर्धेचे परीक्षण अभिजित शिंदे, डॉ. प्रल्हाद माने, सोमनाथ साळुंखे, डॉ. प्रविण पोवार व डॉ. विनायक शिंदे यांनी केले.
विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. ए. के. गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या या कार्यक्रमास जिल्हा युवा अधिकारी पूजा सैनी, विद्यापीठाचे मुख्य वित्त अधिकारी सुजीत सरनाईक, विद्यार्थी कल्याण संचालक अभिजित शिंदे आदी उपस्थित होते. प्रियांका पाटील यांनी सूत्रसंचालन केले, तर आभार दिशा मालगावी यांनी मानले. निलेश कांबळे, संकेत गुरव यांनी परिश्रम घेतले.
कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.





