नागाव येथे वन्यप्राण्यांचा हल्ला; ६ बकऱ्या ठार, मेंढपाळाचे सुमारे ५० हजारांचे नुकसा
नागाव वार्ताहर: मिलिंद कुशिरे
नागाव, ता. हातकणंगले (वार्ताहर) – नागाव येथील मेंढपाळावर वन्यप्राण्यांनी हल्ला करून ६ बकऱ्या ठार केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. या घटनेत सुमारे ५० हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नागाव येथील अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे व सुनील पुजारी यांचा सुमारे ३५० मेंढरांचा कळप गेल्या सात दिवसांपासून खतासाठी सुनील आण्णा शिराळे यांच्या शिराळे मळ्यातील शेतात ठेवण्यात आला होता.
मंगळवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या सुमारास कोल्ह्यासदृश्य वन्यप्राण्यांच्या कळपाने जाळीत ठेवलेल्या कोकरांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात ६ कोकरे जागीच मृत्युमुखी पडली.
घटनेची माहिती शिवाजी रानगे यांनी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे यांना दिली. त्यांनी तत्काळ वन विभागाला कळविले. त्यानंतर वनपाल कुलदीप कांबळे, वनरक्षक प्रदीप जोशी तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा केला.
दरम्यान, पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रवीण नाईक (पशुवैद्यकीय दवाखाना, हेर्ले) यांनी मृत कोकरांचे शवविच्छेदन केले.घटनास्थळी संजय वाघमोडे यांनी भेट देऊन संबंधित मेंढपाळांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी केली. यावेळी डॉ. गोरड, अनिल पुजारी, सदाशिव रानगे, महादेव रानगे, सुनील पुजारी, शिवाजी रानगे आदी मेंढपाळ उपस्थित होते.





