व्यवसाय परवानाधारकांना अभय योजना लागू करुन द्यावी:कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची महापौर रुपाराणी निकम यांच्याकडे मागणी
कोल्हापूर दि. २४ : व्यवसाय परवानाधारकांना अभय योजना लागू करुन त्यांना दिलासा देण्याची मागणी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या शिष्टमंडळाने आज महापौर रुपाराणी निकम यांचेकडे केली. यावेळी चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, परवाना विभागाने परवाना विभाग व अग्निशमन विभाग एकत्र केल्याने ज्या व्यवसाय परवाना धारकांना अग्निशमन कर लागू होत नाही त्या व्यावसायिकांना अग्निशमन कर लागू झाल्याचे आमच्या निदर्शनास आले. गेले ५ वर्षे आम्ही व्यवसाय परवाना विभाग व अग्निशमन विभाग वेगळा करणेबाबत अनेकवेळा निवेदने व बैठका घेतल्या आहेत. परंतु, परवाना विभागाने आजतागायत परवाना विभाग व अग्निशमन विभाग वेगळा केलेला नाही.
चालू आर्थिक वर्षामध्ये परवाना विभागाने परवाना फी मध्ये १० टक्क्यांपासून १०० टक्क्यांपर्यंत वाढ सूचविली होती. या दरवाढीस आम्ही दुसऱ्याच दिवशी विरोध करत दरवाढ मागे घेत नाही तोवर कोणताच व्यावसायिक आपले परवाना नूतनीकरण करुन घेणार नाही असा इशारा महापालिकेला दिला होता व त्याप्रमाणे व्यावसायिकांनी आपले परवाने नूतनीकरण करुन घेतले नव्हते.
परवाना नूतनीकरणाची मुदत ज्या त्या आर्थिक वर्षात १ ते ३० एप्रिल असते. म्हणजे केवळ एकाच महिन्यात संपूर्ण शहरातील व्यावसायिकांना आपले परवाने नूतनीकरण करुन घ्यावे लागतात. परवाना विभागाने सूचविलेल्या दरवाढी मुळे अनेक व्यावसायिकांनी अजूनही आपले परवाने नूतनीकरण करुन घेतलेले नाही. या बाबीस सर्वतोपरी परवाना विभाग जबाबदार आहे.
व्यावसायिकांनी आपले परवाने नूतनीकरण करुन न घेतल्याने परवाना विभाग त्या व्यावसायिकांना दंड व व्याज आकारत आहे. महानगरपालिका फेब्रुवारी महिन्यात घरफाळा व पाणीपट्टी वसुलीसाठी ज्याप्रमाणे अभय योजना लागू करते त्याप्रमाणे व्यवसाय परवाना नूतनीकरणास देखील अभय योजना लागू करावी. व्यवसाय परवानाधारकांना अभय योजना लागू केल्यास सर्व परवाना धारक आपले परवाना नूतनीकरण करुन घेतील. परिणामी महानगरपालिकेच्या उत्पन्नवाढीस हातभार लागेल.
मानद सचिव अजित कोठारी म्हणाले, व्यवसाय परवाना हे महापालिकेच्या उत्पन्नाचे स्त्रोत नसून व्यावसायिकाला व्यवसाय करणेसाठी दिलेला परवाना असतो. परंतु, कोल्हापूर महानगरपालिकेचा परवाना विभाग उत्पन्न मिळविण्याच्या उद्देशाने दरवर्षी फी वाढीचा बोजा व्यावसायिकांवर लादत असते. पुढील आर्थिक वर्षात परवाना विभाग परवाना फी मध्ये दरवाढीचा प्रस्ताव आम सभेमध्ये ठेवणार असल्याचे वृत्तपत्रात छापून आल्याचे सांगितले. सदर प्रस्ताव मान्य होऊ नये असे सांगितले. तसेच प्रत्येकवेळी व्यापाऱ्यांवर अन्याय केला जातो असे देखील त्यांनी सांगितले.यावेळी भाऊ घोगळे, संपत पाटील, महेश मालानी व व्यापारी उपस्थित होते.






