खासदार धैर्यशील माने यांच्या पाठपुराव्याला यश; दुर्गम भागातील नेटवर्क समस्येला दिलासा
रुकडी, ता. २५ : हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील दुर्गम भागातील मोबाईल नेटवर्कची समस्या लवकरच मार्गी लागणार आहे. खासदार धैर्यशील माने यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) कडून सुमारे ७० हून अधिक नवीन मोबाईल टॉवरना मंजुरी मिळाल्याची माहिती त्यांनी दिली.
मतदारसंघातील शाहूवाडी व पन्हाळा तालुक्यांतील डोंगरी आणि दुर्गम वाड्या-वस्त्यांमध्ये नेटवर्कची मोठी अडचण निर्माण होत होती. विशेषतः मुंबईसह अन्य शहरांतून सुट्टीसाठी गावी येणाऱ्या चाकरमान्यांना संपर्क साधताना अडथळे येत होते. स्थानिक नागरिकांनी याबाबत खासदार माने यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला होता.
या पार्श्वभूमीवर खासदार माने यांनी केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेऊन नवीन टॉवर मंजुरीसाठी मागणी केली होती. त्यानंतर केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. अखेर या प्रयत्नांना यश आले असून मतदारसंघात ७० हून अधिक टॉवर मंजूर करण्यात आले आहेत.
यामध्ये शाहूवाडी तालुक्यात ४२, पन्हाळा तालुक्यात ३४ (त्यापैकी १४ गावे हातकणंगले मतदारसंघातील), शिरोळ तालुक्यात ९ आणि हातकणंगले तालुक्यात ५ टॉवरचा समावेश आहे. या टॉवर उभारणीमुळे डोंगरी भागातील तसेच खेडोपाड्यांतील नागरिकांना अखंडित मोबाईल सेवा उपलब्ध होणार असून नेटवर्क समस्येवर मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे, असा विश्वास खासदार माने यांनी व्यक्त केला.






