18 C
New York
Thursday, March 26, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल

मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; धक्कादायक ऑडिओ क्लिप व्हायरल

मुंबई/बीड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना थेट गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देणारी एक कथित ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली असून, त्यामुळे बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. ही ऑडिओ क्लिप ४ फेब्रुवारी २०२६ रोजी समोर आली आहे.

व्हायरल झालेल्या कॉल रेकॉर्डिंगमध्ये दोन व्यक्तींमधील संभाषण ऐकू येते. यामध्ये एक व्यक्ती मनोज जरांगे पाटील यांना “थेट गोळ्या घालून मारण्याची” धमकी देत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. संबंधित इसम “मी स्वतः गोळ्या घालतो… मी तर मनोज जरांगे यांना जीवच मारतो,” असे विधान करत असल्याचे या ऑडिओमध्ये ऐकू येते.

या कथित संभाषणात वाल्मीक कराड यांचे नाव वारंवार घेतले जात असून, धमकी देणारी व्यक्ती ही कराड यांची समर्थक असल्याचा दावा केला जात आहे. उल्लेखनीय म्हणजे वाल्मीक कराड हे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी आहेत. तसेच या संवादात धनंजय मुंडे यांचे नाव पुन्हा घेऊ नये, अशी ताकीद दिल्याचेही ऐकू येते.

या प्रकरणाची पार्श्वभूमी लक्षात घेता ही धमकी अधिक गंभीर मानली जात आहे. यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या हत्येसाठी अडीच कोटी रुपयांची सुपारी देण्यात आल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांना ट्रकखाली चिरडून मारण्याचा कट रचल्याचा दावा करणाऱ्या काही ऑडिओ क्लिप्स याआधीही व्हायरल झाल्या होत्या.

दरम्यान, सदर ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप अधिकृतपणे पोलिसांनी पडताळलेली नाही. मात्र बीड पोलिसांनी या प्रकरणाची दखल घेत तपास सुरू केला असून, धमकी देणारी व्यक्ती नेमकी कोण आहे आणि ऑडिओमागील सत्य काय आहे, याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेनंतर जरांगे समर्थकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून, मनोज जरांगे पाटील यांच्या सुरक्षेत तातडीने वाढ करण्याची मागणी करण्यात येत आहे. प्रकरणाच्या तपासाकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे.

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles