सौ. शांतादेवी डी. पाटील यांच्याहस्ते उद्घाटन , डॉ. वेदप्रकाश मिश्रा प्रमुख उपस्थिती
नवे पारगाव :
लोककल्याणकारी राज्य साकारायचे असेल, तर शिक्षण आणि आरोग्य हे दोन अविभाज्य स्तंभ म्हणून विकसित करणे आवश्यक आहे. तळसंदे येथे सुरु केलेल्या शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटल मुळे ग्रामीण भागतील जनतेला आरोग्याच्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील असे प्रतिपादन डीएमआयएचईआरचे प्र कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी केले. शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
डी. वाय. पाटील एज्युकेशनल सिटी, तळसंदे येथे शांतादेवी डी. वाय. पाटील हॉस्पिटलचे उद्घाटन सौ. शांतादेवी डी. पाटील, डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्या हस्ते झाले. यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, डी वाय पाटील विद्यापीठ,पुणे चे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, प्र. कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील, मेघराज काकडे, शांतीनिकेतनच्या संचालिका सौ. राजश्री काकडे विश्वस्त ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील व देवश्री पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार शर्मा, कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. राजेश ख्यालाप्पा, वैद्यकिय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
डॉ. मिश्रा म्हणाले की, गरीबातील गरीब रुग्णालाही दर्जेदार, सुलभ व सन्मानपूर्वक आरोग्यसेवा मिळणे हीच आधुनिक भारताची ओळख आहे. कोविड-१९ महामारीने सक्षम आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले आहे. ग्रामीण व निमशहरी भागात जागतिक दर्जाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्यास सर्वसामान्यांचा आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास वाढेल. डी. वाय. पाटील ग्रुपने तळसंदे येथे हे हॉस्पीटल उभारून ग्रामीण आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आश्वासक पाउल उचलले आहे.
डॉ. संजय डी. पाटील म्हणाले, तळसंदे भागामध्ये सर्वसामान्य नागरिकांना परवडेल असे आणि दर्जेदार सुविधा देणारे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याची संकल्पना होती. त्यानुसार सुमारे वर्षभरातच या हॉस्पिटलची उभारणी करून आईंच्या वाढदिवसानिमित्त त्याचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी अत्याधुनिक सुविधा तज्ञ डॉक्टरांच्या मार्फत दिल्या जातील. सुरुवातीला १०० बेडचे हे हॉस्पिटल सुरू केल असून लवकरच ३०० बेड मध्ये विस्तारित केले जाईल. या हॉस्पिटलच्या माध्यमातून समर्पित भावनेने रुग्णसेवा केली जाईल.
यावेळी सौ वैजयंती संजय पाटील, सौ. पूजा ऋतुराज पाटील, सौ. वृषाली पृथ्वीराज पाटील, सी. एच. आर. ओ. श्रीलेखा साटम, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, डॉ. जे. ए. खोत, डॉ. पी. एस. पाटील, डॉ. पद्मजा देसाई यांच्यासह डॉक्टर्स, कर्मचारी, विविध संस्थांचे प्राचार्य, अधिकारी उपस्थित होते.
100 बेडचे मल्टी स्पेशालिटी हॉस्पीटल
100 बेडचे सुसज्ज मल्टी स्पेशालिटी रुग्णालय असून, रुग्णांच्या सर्वांगीण उपचारांसाठी अद्ययावत सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णालयात 4 सुसज्ज शस्त्रक्रिया विभाग, 8 बेडचा अत्याधुनिक अतिदक्षता विभाग, 4 बेडचा अपघात विभाग, अनुभवी व प्रशिक्षित वैद्यकीय स्टाफसह 24×7 निवासी डॉक्टर, 24×7 रुग्णवाहिका सेवा व 24×7 औषध विभाग उपलब्ध आहे. तसेच रुग्णांसाठी स्वतंत्र लिफ्ट, उपहारगृह सुविधा व एक्स-रे, सोनोग्राफी, रक्त तपासण्या व ब्लड बँक या सर्व सुविधा एकाच छताखाली देण्यात आल्या आहेत.





