गुणवंत कामगारांच्या मागणीसाठी अधिवेशनात औचित्याचा मुद्दा दाखल :आमदार सतेज पाटील

पत्रकार :- सचिन लोहार
महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाच्यावतीने गुणवंत कामगारांना राज्यातील इतर विभागाच्या पुरस्कार्थीप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बस प्रवासात सवलत देण्यात यावी, यासाठी चालू हिवाळी अधिवेशनात आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी औचित्याचा मुद्दा दाखल केला आहे.अशाप्रकारे प्रवास करताना सवलत मिळावी, राज्यातील आमदार, खासदार, नामदार अशा ७० पेक्षा अधिक लोकप्रतिनिधींनी मा. कामगार मंत्री आकाश फुंडकर यांचेकडे शिफारस केलेली आहे.
तसेच संपूर्ण महाराष्ट्रातील प्रसारमाध्यमातून हि सवलत देण्यात यावी यासाठी, सातत्याने बातम्या प्रसिद्ध होत आहेत. गुणवंत कामगारांना बस प्रवासात सवलत देणेसाठी कामगार विभाग तयार असून मा. प्रधान सचिव – कामगार विभाग यांनी, मा. कामगार मंत्री यांच्याकडे अंतिम मंजुरीसाठी “योजना स्वरूप प्रस्ताव” सादर केला आहे.महत्वाची बाब म्हणजे गुणवंत कामगारांना देण्यात येणाऱ्या या सवलतीचा कोणत्याही स्वरूपाचा आर्थिक बोजा राज्य शासनावर येत नाही.कारण या सवलतीसाठी येणारा सर्व खर्च हा, कामगार कल्याण मंडळ करणार आहे. त्याचबरोबर नवीन योजनांसाठी कामगार मंडळाकडे गुणांकन निधी सुद्धा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाने या प्रस्तावावर तातडीने निर्णय घेऊन गुणवंत कामगारांना एस.टी. बसेस मधून प्रवासाची सवलत द्यावी. तसेच समाजाभिमुख सेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेल्या राज्यातील इच्छुक गुणवंत कामगारांच्या या महत्त्वाच्या विषयाकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी औचित्याच्या मुद्द्याद्वारे आमदार सतेज पाटील यांनी केली असल्याचे त्याचबरोबर प्रधान सचिव कामगार यांनी अंतीम मंजूरीसाठी पाठविलेला प्रस्ताव, राज्याच्या कामगार मंत्री महोदयांनी मान्य करावा व समाजातील सर्वच क्षेत्राप्रती कृतज्ञता जोपासत कार्यरत असणाऱ्या राज्यातील गुणवंत कामगारांना न्याय द्यावा, अशी मागणी राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश केसरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
यावेळी संजय सासने, प्रभाकर कांबळे, अनिता काळे, दिलीप साटम, संभाजी थोरात, देवराव कोंडेकर, भरत सकपाळ, अशोक जाधव, शिवाजी चौगुले, भगवान माने, महादेव चक्के, रघुनाथ मुधाळे, विजय आरेकर, सुभाष पाटील, प्रविण भिके आदी. सहकारी उपस्थित होते.





