अनुशासन व वाहतूक सुरक्षिततेबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
आर. एम. हायस्कूल विद्यालयात पोलीस इन्स्ट्रक्टर उज्वला कारंडे यांच्या सदिच्छा भेटीचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. आगमनानंतर मुख्याध्यापक भातमारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये अनुशासन, वाहतूक सुरक्षितता आणि सामाजिक जबाबदारीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
उज्वला कारंडे यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत वाहतूक नियमांचे पालन का आवश्यक आहे, अपघातांचे वाढते प्रमाण व त्यामागील कारणे, जीवनाचे अमूल्य महत्त्व आणि निष्काळजीपणामुळे होणारे गंभीर परिणाम याबद्दल प्रभावी मार्गदर्शन केले. वाहन चालवताना हेल्मेट, सीटबेल्ट, वेगमर्यादा, ओव्हरटेकिंगचे नियम यांचे महत्त्व त्यांनी सोप्या आणि उदाहरणांसह समजावून सांगितले. ओव्हरटेकिंगदरम्यान त्यांच्या विभागातील महिला कर्मचार्याला झालेल्या अपघाताचा दाखला देत त्यांनी सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण केली.
तसेच, तंबाखू, सिगरेट, दारू आदी व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करत व्यसनाचे तरुणांच्या आरोग्य व भवितव्यावर होणारे गंभीर दुष्परिणाम त्यांनी स्पष्ट केले.यानंतर विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष ट्राफिक कवायत करून दाखवण्यात आली. सावधान, विश्राम, सॅल्यूट, दाहे-बाहे, पीछे मूड इत्यादी आज्ञांनुसार शरीराची हालचाल आणि शिस्त कशी पाळायची याचे उत्कृष्ट प्रशिक्षण त्यांनी दिले. विद्यार्थ्यांनीही उत्साहाने सहभाग नोंदवत अचूक हालचालींचा सराव केला.
कारंडे यांनी पोलीस विभागातील शिस्त, वेळेचे महत्त्व, जनसेवेची भावना आणि नागरिक म्हणून कर्तव्यभावना जोपासण्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने आणि मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांवर सकारात्मक छाप पडली.
कार्यक्रमास शिक्षक मासाळ, पाटील, सोपान भोसले, राजू शिंदे, प्रसाद पवार, कोकरे, पवार, थोरात, सगरे, वासुदेव उपस्थित होते. कार्यक्रमाचे छायाचित्रण प्रसाद माने यांनी केले.





