संविधान साक्षरता ही काळाची गरज : माजी शिक्षण अधिकारी बी. वाय. जगताप यांचे प्रतिपादन”
दौंड, पुणे : “भारतीय संविधान हे जगातील सर्वोत्कृष्ट संविधान असून, सुमारे १४० कोटी भारतीयांच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप त्यात अंतर्भूत आहे. प्रत्येक भारतीय नागरिक संविधान साक्षर होणे ही आजच्या काळाची तातडीची गरज आहे,” असे प्रतिपादन माजी शिक्षण अधिकारी बी. वाय. जगताप यांनी केले.
ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था, दौंड आणि संविधान स्मारक समिती यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रसंत गाडगे महाराज चौकातील संविधान स्मारक येथे संविधान दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. धम्मवंदना अर्पण, संविधान प्रस्तावनेचे वाचन व संविधान स्तंभास अभिवादन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी ‘भारतीय संविधान’ या विषयावर मार्गदर्शन करताना जगताप यांनी संविधानाचे मूलभूत मूल्ये, अधिकार आणि कर्तव्यांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.
कार्यक्रमास दीपक सोनवणे, सदाशिव रणदिवे, आबा वाघमारे, निखिल स्वामी, संजय सोनवणे, मुकेश गायकवाड, गंगाराम सुद्रिकपाटील, मनीष परकाळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
शाळांमध्ये संविधान जागृती उपक्रम
यानंतर ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेच्या माध्यमातून मंगेश मेमोरियल हायस्कूल, श्रीमती जिजामाता हायस्कूल (गोपाळवाडी), जी. प. शाळा गोपाळवाडी, ग्रामपंचायत गोपाळवाडी, जी. प. शाळा गिरिम या शाळांमध्ये संविधान जागृती कार्यक्रम राबविण्यात आला.
या ठिकाणी बी. वाय. जगताप सर, संस्थापक अध्यक्ष सदाशिव रणदिवे, दौंड तालुका अध्यक्ष समीर सय्यद आणि संस्थेच्या महाराष्ट्र राज्य सचिव सौ. रोहिणी पवार यांनी विद्यार्थ्यांना संविधान प्रस्तावनेच्या फ्रेम भेट दिल्या. तसेच विद्यार्थी, पालक व शिक्षकांना संविधानाचे महत्त्व समजावून सांगितले.
या उपक्रमास प्रा. गिरीश सुरवाडे, संजय आढाव, गौतम कांबळे, डॉ. दत्तात्रय जगताप, मुख्याध्यापिका राजश्री बागल तसेच शिक्षकवर्ग यांनी सहकार्य केले. कार्यक्रमात ज्ञानसंकल्प सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





