दौंड नगरपरिषद निवडणुकीत चिन्ह गळतीचा आरोप; अपक्ष उमेदवार जयदीप बगाडे यांनी निवडणूक अधिकाऱ्यावर पक्षपातीपणाचा ठपका”
दौंड, पुणे : दौंड नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ ची प्रक्रिया सुरू असताना चिन्ह वाटपापूर्वीच काही पॅनलच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर प्रचार सुरू केल्याचा गंभीर आरोप अपक्ष उमेदवार बगाडे जयदीप माणिक यांनी केला आहे.
२६ नोव्हेंबर २०२५ रोजी अपक्ष उमेदवारांसह आघाडी व पॅनलना अधिकृत निवडणूक चिन्हे देण्यात येणार होती. ही प्रक्रिया गोपनीय राहणे आवश्यक असतानाच, नागरी हित संरक्षण मंडळ या पॅनलच्या कार्यकर्त्यांनी “कपाट” हे चिन्ह आधीच सोशल मीडियावर प्रसारित केले असून त्यांचे प्रचार साहित्यही छापून तयार असल्याचा दावा बगाडे यांनी केला.
यामुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग झाला असून हा प्रकार लोकशाही प्रक्रियेस घातक असल्याचे बगाडे यांनी सांगितले. या संदर्भात त्यांनी दौंड नगरपरिषद निवडणूक अधिकारी निलप्रसाद चव्हाण यांच्याकडे पुराव्यासह तक्रार दाखल केली आहे. मात्र, स्पष्ट पुरावे दिल्यानंतरही निवडणूक अधिकारी पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
स्थानिक सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यामुळे नगरपरिषद निवडणूक प्रक्रियेत पक्षपातीपणा होत असल्याचा ठपका ठेवत, निवडणूक अधिकारी चव्हाण यांच्या कार्यप्रणालीचीही चौकशी करून आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी बगाडे यांनी आमच्या प्रतिनिधी सदाशिव रणदिवे यांच्याशी बोलताना केली.





