क्रीडा क्षेत्रातील संधीचा सुयोग्य वापर करा – प्रा. निलेश जगताप
आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, मिणचे – 26 वा क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न
आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, मिणचे यांच्या वतीने आयोजित 26 वा वार्षिक क्रीडा महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन बुधवार, दि. 19 नोव्हेंबर रोजी विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यालयातील एनसीसी व एमएमसी च्या विद्यार्थ्यांनी मान्यवर पाहुण्यांना भव्य मानवंदना दिली. त्यानंतर विद्यालयातील राज्य व राष्ट्रीय दर्जाच्या खेळाडूंच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे मैदानावर आगमन झाले.
महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटनेचे सचिव प्रा. निलेश जगताप व जिल्हा क्रीडा अधिकारी कु. विद्या शिरस यांच्या हस्ते क्रीडा ज्योतीचे पूजन करण्यात आले. मैदानावर सादर झालेली मलखांब, योगा, कुस्ती, लाठी-काठी यांची देखणी प्रात्यक्षिके सर्व मान्यवरांनी व विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंदाने पाहिली.
विद्यालयाचे क्रीडा विभाग प्रमुख श्री शिवाजी पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व पाहुण्यांची ओळख करून दिली. त्याचबरोबर विद्यालयाच्या जिमखाना विभागाचे कार्य, तसेच आगामी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न यांचा धावता आढावा उपस्थितांना दिला.
कार्यक्रमास महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सहसचिव प्रा. निलेश जगताप, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, आंतरराष्ट्रीय व्हॉलीबॉल मार्गदर्शक अजित पाटील, राज्य व्हॉलीबॉल मार्गदर्शक अनिकेत बोडके, पीएचसी सावर्डेचे मेडिकल ऑफिसर डॉ. श्रेयश चौगुले, कॅनॉल इन्स्पेक्टर अजिंक्य पाटील, तसेच माजी विद्यार्थी प्रतीक भोसले व प्रज्वल आवटी यांची उपस्थिती लाभली.
प्रमुख पाहुण्यांच्या सत्कारानंतर प्रा. निलेश जगताप विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, “महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व महाराष्ट्र राज्य व्हॉलीबॉल संघटना आदर्श शिक्षण संकुलास नेहमीच पाठबळ देईल. भविष्यातील क्रीडा विकासासाठी आम्ही आपल्यासोबत खंबीरपणे उभे राहू.”
जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी आपल्या मनोगतातून विद्यालयाच्या क्रीडा क्षेत्रातील यशस्वी कामगिरीचे कौतुक केले. आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक अजित पाटील यांनी विद्यालयातील शिक्षकांचे कौतुक करत, “खेळ व शिक्षणाचा सुयोग्य समन्वय हीच या विद्यालयाची ताकद आहे,” असे मत व्यक्त केले.
माजी विद्यार्थी अजिंक्य पाटील यांनी सांगितले की, “इथे मिळालेल्या क्रीडा व शैक्षणिक संस्कारांमुळेच मी घडू शकलो. तुम्हीही याच मार्गाने प्रगती करा.”
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ. दत्तात्रय घुगरे यांनी सांगितले की, “खेळाच्या विकासाकरिता आम्ही अहोरात्र प्रयत्नशील आहोत. आदर्श विद्यालयाचे ऑलिम्पिकपर्यंतचे स्वप्न लवकरच सत्यात उतरेल,” असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपप्राचार्य एम. ए. परीट यांनी मानले. सायंकाळी मुख्य कार्यक्रम ऑलिम्पिकच्या धर्तीवर पार पडला. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मनोरंजनासाठी विद्यालयाचे पालक श्री. डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत रजनी चे बहारदार आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आनंद लुटला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमृत चव्हाण यांनी केले





