विद्यार्थ्यांनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे – पोलीस अंमलदार खोपकर यांचे मार्गदर्शन
शाहूवाडी विभाग निर्भया पथकाच्या वतीने श्री बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ अंबप उदगीरी हायस्कूल उदगीरी व केंद्र शाळा विद्या मंदिर उदगीरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मार्गदर्शन शिबिरात पोलीस अंमलदार रमेश खोपकर यांनी विद्यार्थ्यांनी निर्भयपणे शिक्षण घ्यावे व कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्वरित पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले. त्यांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक जागरूकता व आत्मसंरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करताना शाळेतील मुली आत्मविश्वासाने शिक्षणात व व्यक्तिगत जीवनात पुढे जाव्यात, यासाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर असल्याचे सांगितले.
शिबिरात निर्भया पथकाच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना महिला व मुलींसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती देत सायबर सुरक्षिततेचे भान ठेवण्याचे मार्गदर्शन केले. सोशल मीडियाचा वापर करताना घ्यावयाची काळजी, ऑनलाइन गुन्ह्यांची ओळख व प्रतिबंध, तसेच संकटाच्या प्रसंगी त्वरित मदत मिळवण्यासाठी वापरावयाचे पोलिसांचे संपर्क क्रमांक यांची सविस्तर माहिती देण्यात आली. याशिवाय आत्मसंरक्षणाचे काही मूलभूत उपाय प्रत्यक्ष दाखवून दाखवण्यात आले. सार्वजनिक ठिकाणी व प्रवासादरम्यान स्वतःची सुरक्षा कशी राखावी याबाबतही विद्यार्थ्यांना उपयुक्त सूचना मिळाल्या. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दर्शवत अनेक प्रश्न विचारले, ज्यांचे निरसन निर्भया पथकाने संयमाने केले.
या उपक्रमासाठी उप-पोलीस अधीक्षक आप्पासो पवार, निर्भया पथक प्रमुख अतुल सोनुने, पोलीस हवालदार नेहा पाटील, रमेश खोपकर, अमोल भोसले तसेच मुख्याध्यापक सुनील घाटगे, रोशन मुडे, सुभाष राऊत, शरद जाधव, प्रदीप वाडेकर, प्रणय सुकलकर, भीमराव वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत व प्रस्ताविक शरद जाधव यांनी तर आभारप्रदर्शन सुभाष राऊत यांनी केले.





