रुकडीत जैन मुनी दीक्षा दिन उत्सव; परमपूज्य सारस्वत सागर जी महाराजांचे मार्गदर्शन
रुकडी (ता. हातकणंगले) – जैन धर्माचे तत्त्व आणि मोक्ष मार्गावर चालण्याचे महत्त्व यावर आधारित कार्यक्रम रुकडी येथे पार पडला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते परमपूज्य १०८ सारस्वत सागर जी महाराज होते, ज्यांनी सांगितले की, जैन मुनी दीक्षा म्हणजे मोक्ष मार्गाकडे जाण्यासाठी केलेली वैराग्य प्राप्ती आहे.
सारस्वत सागर जी महाराजांनी पुढे सांगितले की, जैन धर्म हा सर्वात पुरातन धर्म आहे आणि भगवान महावीर यांनी दिलेल्या “जगा आणि जगू द्या” या शिकवणीचे पालन करणारा धर्म आहे. जैन धर्मात जन्म घेणे ही महान पुण्याची गोष्ट असून धर्माचा आचरण मोक्ष मार्गावर चालण्यास मार्गदर्शक ठरतो.
कार्यक्रमात परमपूज्य मुनीश्री १०८ जयंत सागर जी महाराज यांनी आपल्या गुरूंच्या कृपेने बालकांना जैन मुनी दीक्षा देऊन मोक्ष मार्गाकडे मार्गस्थ केलेल्या आनंदाचेही अनुभव सांगितले. तसेच, परमपूज्य मुनीश्री १०८ सिद्ध सागर जी महाराज यांनीही गुरुदेवांच्या मार्गदर्शनाखाली बालकांना मोक्ष मार्गावर चालवण्याचे महत्त्व सांगितले.
कार्यक्रमाची सुरुवात मंगलाचरण आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी तृतीय दीक्षा दिनानिमित्त पादपूजा, जपमाळ भेट, शास्त्र भेट यांचे कार्यक्रम पार पडले. रुकडीसह नांद्रे, नांदणी, जयसिंगपूर, सांगली, शिरढोण, चोकाक या गावांतून मोठ्या संख्येने श्रावक-श्राविका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन श्री १००८ आदिनाथ भगवान दिगंबर जैन मंदिर रुकडी आणि वीर सेवा दल, महावीर तरुण मंडळ, तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी केले. या कार्यक्रमामुळे जैन धर्माच्या तत्त्वांचे जनजागृतीसह धार्मिक आणि सामाजिक भावनांना चालना मिळाली.





