सातवेतील श्रेयस चव्हाण राज्य क्रिकेट संघात निवडले; आयपीएलसाठी पहिला कोल्हापूरकर
सत्याचा शिलेदार न्यूज नेटवर्क
कोल्हापूर – सातवे तालुका पन्हाळा येथील आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडू श्रेयस चव्हाण याची बीसीसीआयमार्फत २३ वर्षांखालील राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली आहे. ही स्पर्धा ७ ते ११ नोव्हेंबर दरम्यान एकदिवसीय साखळी पद्धतीने आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेत महाराष्ट्राबरोबर बडोदा, उत्तराखंड, बिहार, पंजाब, बंगाल आणि छत्तीसगड या राज्यांचे संघ सहभागी असतील.
महाराष्ट्राचा पहिला सामना छत्तीसगडसोबत ७ नोव्हेंबरला, दुसरा सामना बडोदा संघासोबत ११ नोव्हेंबरला होईल. तिसरा सामना उत्तराखंडसोबत १३ नोव्हेंबर, चौथा बिहारसोबत १४ नोव्हेंबर, पाचवा पंजाबसोबत १७ नोव्हेंबर, सहावा बंगालसोबत, आणि सातवा सामना पुन्हा छत्तीसगडसोबत होणार आहे.
श्रेयसची ही निवड नवीन नाही; त्याने २०१८-१९ मध्ये १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघ, २०१९-२० मध्ये विनू मंकड महाराष्ट्र संघ, तर २०२२-२३ व २०२४-२५ मध्ये २३ वर्षांखालील एकदिवसीय व चारदिवसीय राष्ट्रीय स्पर्धासाठीही महाराष्ट्र संघात प्रतिनिधित्व केले आहे.
विशेष म्हणजे, इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये त्याची निवड सौदी अरेबियात (जेद्दाह) झालेल्या मेगा लिलावात झाली असून, तो पहिला कोल्हापूरकर खेळाडू ठरला आहे.
या यशामुळे स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साह निर्माण झाला असून, श्रेयसच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत.





