मुंबई – महाराष्ट्रात हळूहळू हिवाळ्याची सुरुवात झाल्याचे वातावरण आहे. अनेक जिल्ह्यांत हंगामानुसार तापमान खालावले असून लोकांना गारवा जाणवू लागला आहे.मुंबईत हवेतली आर्द्रता कमी झाली असून वातावरणात गारवा वाढला आहे. त्यामुळे सकाळी आणि रात्री लोकांना थंडावा जाणवत आहे.
कोकणातील रायगड जिल्ह्यात थंडीचे पहिले लक्षण दिसून आले असून वातावरण आल्हाददायक झाल्यामुळे पर्यटनाला चालना मिळत आहे. पर्यटकांची संख्या वाढत असून हिवाळ्याचा आनंद घेण्यासाठी अनेकांनी कोकणकडे मोर्चा काढला आहे.नाशिक शहरात आज सकाळी तापमान १०.८ अंश सेल्सियस नोंदवले गेले, तर धुळे जिल्ह्यात तापमान ८.५ अंश सेल्सियस इतके खालावले आहे.
अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मेळघाट परिसर गारठला आहे. स्थानिक लोक आणि पर्यटक सकाळी व संध्याकाळी गारवा अनुभवत आहेत.हिवाळ्याच्या सुरुवातीला तापमानात ही घट सामान्य आहे. त्यामुळे नागरिकांना सकाळी व रात्री बाहेर जाताना उबदार कपडे घालण्याची शिफारस करण्यात येत आहे.थंडीमुळे महाराष्ट्रातील वातावरण अधिक सुखद आणि आल्हाददायक झाले असून, पर्यटन, शहरी व ग्रामीण जीवनावर हिवाळ्याचा सकारात्मक परिणाम दिसत आहे.





