-9.5 C
New York
Sunday, January 25, 2026
spot_img
spot_img
spot_img
spot_img

बौद्ध आयडेन्टिटी प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय व्हा :  सद्धम्मकार प्रा.आनंद देवडेकर यांचे प्रतिपादन

सद्धम्मकार प्रा.आनंद देवडेकर भाषण करताना शेजारी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक डॉ.सुभाष देसाई (गारगोटी जि. कोल्हापूर दि. ३ नोव्हेंबर २०२५)

बौद्ध आयडेन्टिटी प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय व्हा :  सद्धम्मकार प्रा.आनंद देवडेकर यांचे प्रतिपादन

रुकडी/माणगाव, दि.७ (प्रतिनिधी)

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या ऐतिहासिक धम्मचक्र प्रवर्तनातून मिळालेली बौद्ध आयडेन्टिटी धारण करून शोषित वंचित समूहांसमोर एक आदर्श समाज म्हणून धर्मांतरीत समाज उभा राहिल्यास बौद्धमय भारताचे मिशन गतिमान होईल, त्यासाठी धर्मांतरीत बौद्ध समाजाने आता दलित वा बहुजन वादाच्या सापळ्यात न अडकता बौद्ध म्हणून आपली ओळख प्रस्थापित करण्यासाठी सक्रिय व्हायला हवे, असे सुस्पष्ट प्रतिपादन अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा.आनंद देवडेकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे बोलताना केले.भुदरगड तालुक्यातील वाघापूरचे सुपुत्र एकनाथराव कांबळे यांनी बांधलेल्या नूतन वास्तूच्या गृहप्रवेश सोहळ्यास विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहिलेल्या प्रा.आनंद देवडेकर यांच्या आगमनानिमित्त ॲड.डी.बी.कांबळे यांच्या प्रयत्नाने भुदरगड तालुका बौद्ध समाज व ध्यान धारणा केंद्र, गारगोटी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील के.डी.देसाई विरंगुळा सभागृहात सोमवार दि.३ नोव्हेंबर रोजी प्रा.आनंद देवडेकर यांचे ‘बौद्ध आयडेन्टिटी’ या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्या प्रसंगी प्रा.देवडेकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार, व संशोधक साहित्यिक डॉ.सुभाष देसाई हे होते. चळवळीच्या नावावर राजकारणातील बदलत्या प्रवाहात वेळोवेळी बदलणाऱ्या भूमिका बौद्ध आयडेन्टिटीला कशा मारक ठरल्या आहेत याचे आपल्या दिड तासाच्या व्याख्यानात तपशीलवार विश्लेषण करून येणाऱ्या जनगणनेत आपली नोंद बौद्ध म्हणून करण्यासाठी आतापासूनच जनजागृती करायला सुरुवात करा, असेही आवाहन प्रा.देवडेकर यांनी शेवटी  आपल्या भाषणात केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डॉ.सुभाष देसाई आपल्या भाषणात म्हणाले की, अतिशय मुद्देसूद मांडणीनं विषयाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाणारं प्रा.देवडेकर यांचं भाषण ऐकून फार समाधान वाटलं. मी ऐकलेल्या महाराष्ट्रातील चांगल्या वक्त्यांच्या भाषणांपैकी हे एक भाषण असून यावरून त्यांच्या सद्धम्म पत्रिकेचा दर्जा आणि वैचारिकता लक्षात येते.प्रा.देवडेकर यांनी सद्धम्म पत्रिका पुन्हा सुरू करावी आणि आपण उपस्थित सर्वांनी त्यांना सहकार्य करावे.या विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन पत्रकार के.के.भारतीय यांनी केलं तर आभार प्रदर्शन ध्यान धारणा केंद्र, गारगोटीचे आयुष्यमान यशवंत सरदेसाई सर यांनी केलं. व्याख्यानानंतर झालेल्या चर्चेत सुनील कांबळे, प्राचार्य सुहास निर्मळे, सरदेसाई, ॲड. डी.बी. कांबळे इत्यादिंनी सहभाग घेतला.या व्याख्यानास मासिक अनुबोधचे संपादक पत्रकार मिलिंद प्रधान, प्रा.दयानंद माने, के.वाय.धम्मरक्षित, साताप्पा भारतीय तसेच भारतीय बौद्ध महासभा व ध्यान धारणा केंद्र, गारगोटीचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. दरम्यान व्याख्यान कार्यक्रम संपल्यानंतरही विषयाच्या अनुषंगानं लोक उत्साहानं चर्चा करताना दिसत होते.

 

spot_img

जगभरातील बातम्या

- Advertisement -spot_img

Latest Articles