कोल्हापुरी चप्पल उद्योगासाठी ‘डिजिटल’ क्रांती: QR कोड आणि NFC चीप अनिवार्य :रविंद्र माणगावे
कोल्हापूर, दि. २८:
कोल्हापुरी चप्पल, जो केवळ एक उत्पादनाचा प्रकार नाही तर कोल्हापूरचा जागतिक वारसा आहे, त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे अत्यावश्यक आहे. जर या उद्योगाने काळानुरूप परिवर्तन केले नाही, तर नामशेष होण्याची शक्यता आहे, असा स्पष्ट इशारा महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष रविंद्र माणगावे यांनी दिला.
कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या सभागृहात कोल्हापुरी चप्पल उत्पादक आणि व्यावसायिकांसाठी आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. कोल्हापुरी चप्पलमध्ये आता क्यूआर कोड (QR Code) आणि एनएफसी चीप (NFC Chip) वापरण्याचे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जात आहे.
माणगावे म्हणाले, “या तंत्रज्ञानामुळे चप्पलचे मूळ, दर्जा, उत्पादक आणि कारागीर यांची खरी माहिती थेट ग्राहकांपर्यंत पोहोचेल. यामुळे नकली चप्पलविक्री थांबेल आणि कारागिरांना त्यांच्या कौशल्याचे योग्य मूल्य मिळेल.” महाराष्ट्र चेंबर या बदलात उद्योगाला सर्वतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी इमरटेक इनोव्हेशनचे गौरव सोमवंशी यांनी क्यूआर कोड, एनएफसी चीप आणि ब्लॉकचेन प्रणालीचे प्रत्यक्ष सादरीकरण केले.
ब्लॉकचेनचा फायदा:
चर्मोद्योगात ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरल्यास संपूर्ण उत्पादन साखळी पारदर्शक, विश्वासार्ह आणि सुरक्षित बनेल. चामडी कोठून आली, कोणी तयार केली, आणि कोणी विकली, या सर्व नोंदी ब्लॉकचेनवर अचूकपणे आणि अपरिवर्तनीय पद्धतीने होतील. यामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल आणि ब्रँड व्हॅल्यू मजबूत होईल.





