मुंबई हादरली! ब्रेकअपच्या रागातून प्रियकराने तरुणीला भोसकले, दोघांचाही मृत्यू; काळाचौकीत रक्तरंजित थरार
गणेश सुतार मुबंई
मुंबई: प्रेमसंबंध संपुष्टात आल्याच्या (ब्रेकअप) रागातून एका तरुणाने आपल्या माजी प्रेयसीवर चाकूने जीवघेणा हल्ला केला आणि त्यानंतर स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मुंबईतील काळाचौकी परिसरात घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तरुणीचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, ज्यामुळे प्रेमाचा हा रक्तरंजित शेवट झाला.
सोनू बरई (वय २४) असे मृत तरुणाचे नाव असून मनीषा यादव (वय २४) असे मृत तरुणीचे नाव आहे. दोघेही काळाचौकी परिसरात राहणारे होते आणि काही महिन्यांपूर्वी त्यांचे प्रेमसंबंध तुटले होते. तरुणाला संशय होता की तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीशी संबंध आहेत, याच संशयावरून त्यांच्यात वारंवार वाद होत होता.
शुक्रवारी सकाळी ११ च्या सुमारास काळाचौकी येथील दत्ताराम लाड मार्गावर दोघांची भेट झाली. पुन्हा वाद सुरू झाल्यावर संतापलेल्या सोनूने आपल्या खिशातील चाकू काढून मनीषावर वार केले. जीव वाचवण्यासाठी मनीषा जवळच्या एका नर्सिंग होममध्ये धावली, पण सोनूने तिचा पाठलाग करून तिच्यावर पुन्हा हल्ला केला.
तरुणीला रक्तबंबाळ केल्यानंतर सोनूने त्याच चाकूने स्वतःचा गळा चिरला. या घटनेत तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. दिवसाढवळ्या घडलेल्या या भयानक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. काळाचौकी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.





