मुरगुडच्या विकासकामासह गोरगरिबाच्या जीवनात आनंद, समाधान आणणे हाच माझा ध्यास: मंत्री हसन मुश्रीफ
माजी नगराध्यक्ष पैलवान सुखदेव येरुडकर यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश
पत्रकार- सुभाष भोसले
मुरगुड: मुरगुड नगरीला ग्रामदैवत श्री. अंबाबाई आणि संत श्री. बाळूमामा यांच्या कृपेने सर्वांगीण विकासाच्या माध्यमातून ‘सर्वांगसुंदर’ बनवण्याचा ध्यास असल्याचे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. त्यांनी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला एकहाती सत्ता देण्याचे आवाहन करत, कागल शहराप्रमाणे मुरगुडचा चेहरा-मोहरा बदलू आणि सर्व कल्याणकारी योजना नागरिकांच्या घराघरापर्यंत पोहोचवू, अशी ग्वाही दिली.
मुरगूड नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) कार्यकर्त्यांचा मेळावा उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितसिंह पाटील होते. याच मेळाव्यात माजी नगराध्यक्ष पैलवान सुखदेव येरुडकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला. मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आले.
विकास आणि गोरगरिबांच्या जीवनात आनंद हाच ध्यास
मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, “विकासकामांसह गोरगरिबांच्या जीवनात आनंद आणि समाधान आणणे हाच माझा ध्यास आहे.” पुढील पाच वर्षांत मुरगुडमधील सीसीटीव्ही, तलावाचे सुशोभीकरण, रस्ते, शहराला जोडणारे इतर रस्ते, पिण्याच्या पाण्याची सुधारित योजना, मूलभूत सुविधा ही कामे पूर्ण केली जातील. तसेच, कागलप्रमाणे अवघ्या दहा हजार रुपयांमध्ये गोरगरिबांना तीन हजार घरे देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मुरगुडमध्ये राबवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. सेनापती कापशी रस्त्यावर सरपिराजीराव तलावाच्या सांडव्यावर इलेव्हेटर ब्रिज आणि वेदगंगा नदीत जाणाऱ्या सांडपाण्यावर प्रक्रिया प्रकल्प अद्यावत करण्याची योजनाही त्यांनी सांगितली. “कागलच्या पद्धतीने सार्वजनिक स्वच्छतेसह वैशिष्ट्यपूर्ण विकासकामे शहरांमध्ये करून दाखवू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. लोकांच्या इच्छेचा आणि त्यांना पसंत पडेल असाच उमेदवार पक्ष देईल, त्याच्या पाठीशी सर्वांनी उभे राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
राष्ट्रवादीचे कार्यालय गोरगरिबांसाठी मंदिर बनेल
मंत्री मुश्रीफ पुढे म्हणाले, मंत्रीपदाच्या काळात कार्यान्वित केलेल्या शेकडो योजना सामान्य नागरिकांच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी करावे. मुरगुडचे राष्ट्रवादी पक्षाचे कार्यालय हे गोरगरिबांपर्यंत शासकीय योजना नेणारे ‘मंदिर’ बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच, कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयाचा (सीपीआर) कायापालट लवकरच पूर्ण होत असून, कोल्हापुरात शेंडा पार्कमध्ये लिव्हर, हार्ट, किडनी ट्रान्सप्लांटची सर्व ऑपरेशन्स होतील इतके अद्ययावत मेडिकल हब निर्माण होत असल्याची माहिती त्यांनी दिली.
मुश्रीफ यांच्या कामाची हातोटी राज्यात आदर्श- रणजितसिंह पाटील
अध्यक्षीय भाषणात रणजितसिंह पाटील यांनी मंत्री मुश्रीफ यांच्या कामाच्या पद्धतीचे (हातोटी) कौतुक केले. त्यांच्या कामाची हातोटी राज्यात आदर्श आहे. “देशातील आदर्श देखणी आणि उल्लेखनीय विकासकामे त्यांनी कागल शहरात उभारली आहेत,” असे ते म्हणाले. मुरगूडच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष आणि सर्व २० उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून त्यांचे हात बळकट करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कागलसारखे मुरगुड शहर करून दाखवावे – राजेखान जमादार
प्रास्ताविकात माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार म्हणाले, “मुरगुडची सत्ता मंत्री श्री. मुश्रीफ यांच्याकडे देऊया, त्यांनी कागलसारखे मुरगुड शहर करून दाखवावे.” मंत्री मुश्रीफ, नेते रणजितसिंह पाटील आणि सुखदेव येरुडकर यांच्या नेतृत्वाखाली मुरगुड पालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुश्रीफ यांच्या कामाची गती पाहून शहरातील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून, उमेदवार निश्चित करण्यापूर्वी पक्ष सर्वे आणि मुलाखती घेऊनच निवड करेल, असेही त्यांनी सांगितले.
प्रा. चंद्रकांत जाधव आणि सुखदेव येरुडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर सौ. मंजुषादेवी पाटील, सौ. तस्लिमा जमादार, माजी नगराध्यक्षा फुलाबाई कांबळे, नम्रता भांदिगरे, माया चौगले, गौराबाई सोनुले, संतोष वंडकर, बजरंग सोनुले, विश्वजीत पाटील, नामदेव भांदिगरे, अशोक खंडागळे, पद्मसिंह पाटील, राजाराम गोधडे, सुनील चौगले, राजू आमते आदी उपस्थित होते. स्वागत रणजीत सूर्यवंशी यांनी केले, सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले तर नंदकिशोर खराडे यांनी आभार मानले.





