महावितरणची पुनर्रचना ग्राहक व कर्मचारी हिताची; सेवा व वसुलीला प्राधान्य द्या – कार्यकारी संचालक परेश भागवत
कोल्हापूर, दि. २४ ऑक्टोबर २०२५:
महावितरणमध्ये लागू करण्यात येत असलेली पुनर्रचना ही वीज ग्राहक आणि कर्मचारी या दोघांसाठीही अत्यंत लाभदायक ठरणार आहे, असे मत कार्यकारी संचालक (देयक व महसूल/मानव संसाधन) परेश भागवत यांनी व्यक्त केले. पुनर्रचनेमुळे ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा मिळेल, तसेच कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी होईल. सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने हा बदल स्वीकारावा, असे आवाहन त्यांनी केले.
महावितरणच्या कोल्हापूर परिमंडल अंतर्गत ‘विद्युत भवन’ येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता (अंतर्गत सुधारणा विभाग) मिलिंद दिग्रसकर, कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्निल काटकर यांच्यासह कोल्हापूर व सांगली मंडळाचे अधीक्षक अभियंता उपस्थित होते.
भागवत यांनी स्पष्ट केले की, अभियंते व तांत्रिक कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण कमी करून त्यांना निवडक कामांची जबाबदारी देण्यासाठी हे प्रारूप तयार करण्यात आले आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना अनेक कामे एकाच वेळी करण्याऐवजी विशिष्ट कामांवर लक्ष केंद्रित करता येईल, परिणामी कार्यक्षमतेत वाढ होईल व ग्राहकसेवा अधिक चांगली होईल.
यावेळी त्यांनी ग्राहक सेवेवर अधिक भर देण्याच्या सूचना दिल्या. ते म्हणाले, “फिल्डवर काम करताना ग्राहकांच्या अडचणी तात्काळ सोडवा. ग्राहकांना वीज सेवा देताना व्यावसायिक दृष्टिकोन बाळगा. उच्चदाब ग्राहकांच्या तक्रारी शून्यावर आणा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ग्राहकांना वेळेत बिल द्या आणि थकबाकीची प्रभावी वसुली करा.” शासकीय आणि वाणिज्य ग्राहकांचे मीटर प्राधान्याने टीओडी स्मार्ट मीटरने बदलण्याचे निर्देशही त्यांनी दिले. वीज हानी कमी करण्यावर लक्ष केंद्रित करून माहिती तंत्रज्ञान विभागाच्या अहवालानुसार कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली.
या बैठकीत कोल्हापूर परिमंडलातील सध्या सुरू असलेल्या विविध योजना आणि कामांचे सादरीकरण करण्यात आले.





