दिवाळीनिमित्त पीस फाउंडेशनचा माथेरानमध्ये अनोखा उपक्रम

गरीब आणि अंगणवाडीतील मुलांना वाटले जीवनावश्यक वस्तू व मिठाई
माथेरान: रायगड-माथेरान येथील आदिवासी पाडे आणि गरीब जनतेला अनेक वर्षांपासून मदतीचा हात देणाऱ्या ‘पीस फाउंडेशन’ने यंदा दिवाळीनिमित्त एक आगळावेगळा आणि कौतुकास्पद उपक्रम राबवला. अंगणवाडीतील मुलांनी सुंदर प्रार्थना बोलून या कार्यक्रमाची सुरुवात केली.
‘पीस फाउंडेशन’चे अध्यक्ष योगेश शहा आणि डॉक्टर चारुल शहा यांच्या पुढाकाराने तसेच ‘श्री नानीलाल दलिचंद मेहता चॅरिटेबल ट्रस्ट’चे भरतभाई मेहता, रमेश भाई पटेल, महेश भाई पटेल, भावना कटारिया, प्रवीण भाई दावडा (जलाराम मॅरेज बिरो), परेशभाई सावला, टीना गाडा, नेमीदास भाई गाला, कुंचलबेन शहा, डॉक्टर बीना, विरेन वीरा, व्योनी आणि हर्षा बेन, जय ठक्कर, दिलीप मेहता, चंदनबिंद छेडा, रजनी शंकरन, निमेश जकारिया यांच्यासारख्या अनेक दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने हा उपक्रम यशस्वी झाला.
या उपक्रमांतर्गत माथेरानमधील गरीब जनता आणि अंगणवाडीतील लहान मुलांना दिवाळीच्या शुभेच्छांसोबतच जीवनावश्यक वस्तूंचे व भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. वाटप केलेल्या सामानामध्ये मिठाई, फरसाण, तेल, बेसन, साखर, गूळ, चणाडाळ, मैदा, रवा, मीठ, छोटे-मोठे टॉवेल, केक, चॉकलेट, तसेच वही-पेन्सिलचा समावेश होता.
या समाजोपयोगी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माथेरानमधील ‘महिला मैत्री ग्रुप’ने मोलाचे सहकार्य केले. या कार्यक्रमामुळे अंगणवाडीतील लहान मुले आणि गरीब जनतेच्या चेहऱ्यावर आनंद फुलला, ज्यामुळे दिवाळीचा हा सोहळा अधिकच अर्थपूर्ण झाला.






