कोल्हापुरातील व्हिनस लॉजिंगवर पोलिसांचा छापा: महिलांच्या आर्थिक दुर्बलतेचा गैरफायदा घेत वेश्या व्यवसाय चालवणारा गजाआड, दोन पीडितांची सुटका
कोल्हापूर: कोल्हापूर शहरातील व्हिनस चौक येथील ‘व्हिनस लॉजिंग’मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांचा वापर करून अवैध वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या व्यक्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, आरोपीस अटक करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षक मा. श्री. योगेशकुमार यांच्या सूचनेनुसार आणि पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली. गुप्त माहितीच्या आधारे पोलीस पथकाने दिनांक ६ ऑक्टोबर २०२५ रोजी व्हिनस लॉजिंगवर छापा टाकला.
कारवाईदरम्यान जयसिंग मधूकर खोत (वय २६, रा. कुंभारवाडी, ता. शाहुवाडी, जि. कोल्हापूर) या लॉजिंगच्या मालकास ताब्यात घेण्यात आले. त्याच्या ताब्यातून उत्तर प्रदेश व रायगड जिल्ह्यातील दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या धाडीत ९,२५० रुपये रोख रक्कम, एक मोबाईल हँडसेट व काही निरोध पाकिटे जप्त करण्यात आली आहेत.
चौकशी दरम्यान आरोपीने महिलांना आर्थिक गरज असल्याचा फायदा घेत त्यांना देहविक्रयासाठी भाग पाडल्याचे उघड झाले. प्रत्येक ग्राहकाकडून ३,००० रुपये घेतले जात असून त्यातील १,५०० रुपये आरोपीकडे आणि ५०० रुपये खोलीच्या भाड्यासाठी घेतले जात असल्याचे उघड झाले आहे.
ही महत्त्वपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक श्री. योगेशकुमार, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक स्वाती यादव, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र घारगे व हिंदुराव चरापले आणि त्यांच्या पथकातील पोलीस अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली.सदर प्रकरणी पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.





