जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
पेठ वडगाव : स्वातंत्र्यसैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनिअर कॉलेज, मिणचे प्रमुख व आदर्श गुरुकुल शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. दत्तात्रय घुगरे यांना महाराष्ट्र शासनाचा “क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त झाला असून, जिल्हा परिषद कोल्हापूर मार्फत राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री नामदार श्री. प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी आमदार अशोकराव माने, विद्यालयाच्या सचिव व मुख्याध्यापिका सौ. महानंदा घुगरे, पर्यवेक्षक एस. जी. जाधव, प्रा. चंद्रकांत बागणे, डॉ. शिवराज घुगरे आदी मान्यवर उपस्थित होते.
डॉ. घुगरे यांच्या नेतृत्वाखाली विद्यालयात १,०४,४४४ सूर्यनमस्कार, ५५५ विद्यार्थ्यांसह शिवचरित्र पारायण, व ११११ विद्यार्थ्यांसह संविधान पारायण यांसारखे प्रेरणादायी उपक्रम राबवले गेले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ४२३ राष्ट्रीय, २७९० राज्यस्तरीय व ४६७० जिल्हास्तरीय खेळाडू घडले असून, ते राज्यस्तरीय अभ्यासक्रम समितीचे तज्ज्ञ सदस्य म्हणूनही कार्यरत राहिले आहेत.
शिक्षणासोबत सामाजिक कार्यातही डॉ. घुगरे यांची आघाडी राहिली आहे. त्यांनी गरजू, गरीब व अनाथ विद्यार्थ्यांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण मोफत केले आहे. हजारो वृक्षांची लागवड, पर्यावरण संवर्धन, व नैसर्गिक आपत्तीतील मदतकार्य यांसारख्या उपक्रमांत त्यांचा मोलाचा सहभाग आहे.
त्यांच्या नेतृत्वातील संस्थेने “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” स्पर्धेत जिल्हा व राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. तसेच, विविध शैक्षणिक व क्रीडा संस्थांवर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार” प्राप्त डॉ. दत्तात्रय घुगरे सर यांचा सन्मान कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या शिक्षणाधिकारी मा. सुवर्णा सावंत यांच्या शुभहस्ते करण्यात आला.







